ladki Bahin Yojana Gift: राज्य सरकारने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ आता महिलांसाठी आर्थिक सक्षमतेचा एक नवा मार्ग उघडत आहे. मुंबईतील या योजनेच्या लाभार्थ्यांना आता एक मोठी संधी मिळाली आहे. मुंबई बँकेच्या माध्यमातून महिलांना शून्य टक्के व्याजदराने तब्बल १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे.
मुंबई बँकेचे अध्यक्ष, प्रवीण दरेकर यांनी याबद्दल माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अशी इच्छा होती की या योजनेतून मिळणारे पैसे महिलांनी उद्योग-व्यवसायात गुंतवून आर्थिक प्रगती साधावी. हीच बाब लक्षात घेऊन, आता ९ टक्के व्याजदराने मिळणारे कर्ज थेट शून्य टक्के दराने दिले जाणार आहे.
हे गणित कसं काम करतं?
या योजनेत व्याजाचा परतावा चार प्रमुख महामंडळांकडून केला जातो, ज्यामुळे महिलांना कर्ज घेताना कोणतीही अडचण येत नाही.
- पर्यटन महामंडळाची ‘आई योजना’: या योजनेतून महिलांना १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा मिळतो.
- अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ
- भटके विमुक्त महामंडळ
- ओबीसी महामंडळ
या चार महामंडळांच्या योजनांमध्ये ज्या महिला लाभार्थी बसतात, त्यांना मुंबई बँकेकडून शून्य टक्के व्याजदरात कर्ज मिळू शकते.
कर्जाची रक्कम आणि अर्ज करण्याची प्रक्रिया
- कर्ज मर्यादा: एका महिलेला १ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. पाच ते दहा महिला एकत्र येऊनही व्यवसाय सुरू करू शकतात.
- अर्ज प्रक्रिया: मुंबई बँकेकडे अर्ज केल्यानंतर बँकेकडून व्यवसायाची तपासणी केली जाईल. व्याजाची रक्कम महामंडळाकडून बँकेला मिळेल, त्यामुळे लाभार्थ्यांना कोणताही आर्थिक भार पडणार नाही.
सध्या मुंबईतील सुमारे १२ ते १३ लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ही योजना केवळ मुंबईतील महिलांसाठी सुरू झाली असून, भविष्यात याचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्याची उत्तम संधी मिळाली आहे.